अश्वमेध दहीहंडीत गोविंदांचा थरार

Foto

महात्मा फुले चौकात जल्लोष
संभाजीनगर, छत्रपती (सांजवार्ता ब्युरो): संभाजीपेठ येथील महात्मा फुले चौकात शनिवारी (दि.५) सायंकाळी अश्वमेध दहीहंडी महोत्सव उत्साहात पार पडला. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गेल्या ३३ वर्षांपासून सुरू असलेली दहीहंडीची परंपरा यंदाही कायम राहिली. गोविंदा पथकांनी सादर केलेले थरारक मानवी मनोरे आणि दहीहंडी फोडण्यासाठी सुरू असलेली चुरस यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ढोल-ताशांचा गजर, गोविंदांचा उत्साह आणि नागरिकांची
मोठी गर्दी यामुळे महात्मा फुले चौक परिसर दुमदुमून गेला. या महोत्सवाला स्टार प्लसवरील मान के हम यार नहीं या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, महापौर समीर राजूरकर, माजी महापौर बापू घडामोडे, नगरसेवक
रवी कावडे, नगरसेवक पदमसिंह राजपूत, नगरसेविका अमृता पालोदकर, नगरसेविका कीर्ती शिंदे, दीपक खोतकर, राजू शिंदे आणि अकरा गोविंदा पथकांनी यामध्ये सहभाग नोंदविला. यावेळी कृष्ण केसरी गोविंदा पथक विजेते संघ ठरला. अध्यक्ष दय्यू आहेर यांच्या नेतृत्वाखाली गोविंदानी कामगिरी बजावली.